chessbase india logo

जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न

by Vivek Sohani - 21/05/2025

रत्नागिरी – जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात दि. १७ व १८ रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धांना रायसोनी फौंडेशन तर्फे विशेष सहकार्य लाभले होते. विविध वयोगटांतील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, प्रगल्भ खेळी आणि उत्कृष्ट आयोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत विविध गटांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ९ वर्षाखालील गटातून दोन मुले व १५ वर्षे वयोगट आणि खुल्या व महिलांच्या गटातून प्रत्येकी ४ खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धेसाठी करण्यात आली. निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

विविध गटांत अर्णव चव्हाण, सई प्रभुदेसाई विहंग सावंत आणि वरद पेठे विजयी

दि. १७ रोजी ९ व १५ वर्षाखालील गटांच्या निवड स्पर्धा खेळवण्यात आल्या. सदर स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू सुभाष शिरधनकर व चेसमेन रत्नागिरीचे सचिव व ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू सुहास कामतेकर उपस्थित होते. श्री. कामतेकर यांनी खेळाडूंना निकालाकडे लक्ष न देता खेळाचा जास्तीत जास्त आनंद घेण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच उत्तम निकाल येत जातील असे सांगितले. त्यांच्या हस्ते खालीलप्रमाणे विजेत्यांना गौरविण्यात आले.

९ वर्षाखालील व १५ वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धेतील विविध पारितोषिक विजेते

पंधरा वर्षाखालील गट : 

प्रथम क्रमांक – अर्णव चव्हाण ; द्वितीय क्रमांक – आर्यन धुळप, तृतीय क्रमांक – आयुष रायकर, चतुर्थ क्रमांक – निधी मुळे; उत्तेजनार्थ : राघव पाध्ये, ओम तेरसे, रु‍मिन वस्ता

पंधरा वर्षाखालील मुली : 

प्रथम क्रमांक – सई प्रभुदेसाई, द्वितीय क्रमांक – सानवी दामले, तृतीय क्रमांक – तनया आंब्रे, चतुर्थ क्रमांक – आर्या पळसुलेदेसाई; उत्तेजनार्थ : मृण्मयी दांडेकर, साची चाळके, 

नऊ वर्षाखालील गट: 

प्रथम क्रमांक – विहंग सावंत, द्वितीय क्रमांक – पारस मुंडेकर; उत्तेजनार्थ बक्षिसे – अर्णव गावखडकर, रजत जोगळेकर

दि. १८ रोजी खुल्या व महिला गटांच्या निवड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला फिडे मानांकित खेळाडू व भारतीय जीवन विमा निगम रत्नागिरी येथे विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. अनंत गोखले व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव, अभाविप प्रदेश अध्यक्ष, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट व व्होकेशनल बोर्ड अश्या विविध आघाड्यांवर कार्यरत असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते. श्री. दुदगीकर यांनी बुद्धिबळ हा खेळ आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वावर कसा बदल घडवू शकतो ह्यावर खेळाडूंना संबोधित केले. एकाग्रता, सय्यम, मेहनत आणि चिकाटी ही यशाची चतुःसूत्री मुलांना सांगत उपस्थित पालकांची वाहवा मिळवली. त्यांच्या हस्ते खालीलप्रमाणे विजेत्यांना गौरविण्यात आले. निधी मुळ्ये हिने तुलनेने अधिक काठीण्य पातळी असलेल्या खुल्या गटात खेळून आपल्या खेळाचा कस पणाला लावत खुल्या गटातून खेळूनही जिल्हा संघात स्थान मिळवले. वरद पेठे (६/६) व सई प्रभुदेसाई (५.५/६) यांनी आपापल्या अपराजित राहून स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. अनिकेत रेडीज, यश गोगटे यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ केला.

खुल्या व महिला गटातील विविध पारितोषिक विजेते

महिला गट:

प्रथम क्रमांक – सई भूषण प्रभुदेसाई, द्वितीय क्रमांक – तनया आंब्रे, तृतीय क्रमांक – मृणाल कुंभार, चतुर्थ क्रमांक – अदिती पाटील; उत्तेजनार्थ : सानवी दामले, आर्या पळसुलेदेसाई

खुला गट:

प्रथम क्रमांक – वरद पेठे, उपविजेता – यश गोगटे, तृतीय क्रमांक – अनिकेत रेडिज, चतुर्थ क्रमांक – निधी मुळे; उत्तेजनार्थ : अपूर्व बंडसोडे, आयुष रायकर, विहंग सावंत, सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू – सुहास कामतेकर

विजेते : खुला गट, १५ वर्षाखालील गट आणि नऊ वर्षाखालील गट

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रायसोनी फौंडेशन कडून स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले.


Contact Us